Saturday, 31 March 2018

शिव पुण्यतिथी

*शिवभारत संपले.*

     दुःखाचा एकदम टवका उडाला. सर्वांच्या डोळ्यातून ढसाढसा अश्रू वाहू लागले. सर्वांच्या हृदयात अकांत उडाला. तोंडातून शब्द उमटेना. केवढी धुरंधर माणसे ही ! पण दुःखाश्रूंचा  लोंढा फुटला त्यांच्या काळजातून. जणू सह्याद्रीची शिखरे आणि स्वराज्यातील निधड्या छातीचे किल्ले ढसाढसा रडूं लागले.

    महाराज..!!
    महाराज..!!
    पण महाराज अत्यंत शांतपणे त्यांना म्हणाले , "तुम्ही चुकुर होऊ नका. हा मृत्यूलोकच आहे. या मागे किती उत्पन्न झाले तितके गेले. आता तुम्ही निर्मळ सुखरूप बुद्धीने असणे. आता अवघे बाहेर बैसा. आपण श्रींचे स्मरण करतो."
         केवढी ही मनाची तयारी! अवघे मोहपाश दूर सारून, अवघी सुखदुःखे पूर्ण विसरून महाराज अखेरच्या महायात्रेला निघाले.! महाराज दक्षिणदिग्विजयाला निघाले ! होय फार फार प्रचंड दिग्विजयाला निघाले. पण सर्वांना कायमचे सोडून, सर्वांना आसवांच्या महासागरात लोटून महाराज चालले ! महाराजांनी सर्वांचा निरोप घेतला !
      सर्वजण बाहेर आले. दुपारचे सुमारे बारा वाजले होते.
      आणि श्रींचे नामस्मरण करीत करीत महाराजांनी मृत्यूचे बोट धरले ! आजवर जिंकलेले राज्य, किल्ले, हत्ती, घोडे, धनदौलत सोडून देऊन , आजवर जोडलेल्या आप्त -इष्ट -मित्रांची मोहमाया सोडून , आजवर मिळवलेली सर्व यशकीर्ती तशीच टाकून देऊन आणि धारण केलेली छत्रचामरे, सिंहासन आणि बिरुदावली जशीच्या तशीच सोडून देऊन , कशाकडे मागे वळून न पाहता महाराज मृत्यूचे बोट धरून संथपणे निघून गेले
आणि शिवभारत संपले !
काय लिहू ?
शब्दच संपले !

तव शौर्याचा एक अंश दे,
तव धैर्याचा जरा स्पर्श दे,
तव तेजांतिल एक किरण दे,
जीवनांतला एकच क्षण दे !!

*छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी.*
*चैत्र पौर्णिमा*

-

🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏

Thursday, 29 March 2018

छत्रपती शिवाजी महाराज या नावात प्रत्येक व्यक्तीला एवढा intrest का जाणून घ्या

All Hikers ... Plz read.... 👇🚩

परवा एका IT क्षेत्रातली व्यक्ति मला म्हणाली तुला "अरे तुला शिवाजीत एवढा इंटरेस्ट का आहे ?
जगात इतके पराक्रमी राजे आहेत ?

सारखं आपलं शिवाजी शिवाजी.  तो थोडीच जगातला सगळ्यात पराक्रमी राजा होता?"

त्याला मी म्हणालो नीट ऐक,
"मी जाणिवपूर्वक विधान करतो की शिवाजी महाराज हे सतराव्या शतकातले आंतरराष्ट्रीय किर्तीचे सेनानी होते. जगात तुलना नाही असे राजे होते..."

माझं बोलणं मध्येच तोडत ती व्यक्ती म्हणाली
"सिध्द करून दाखव"

मी ठीक आहे म्हणलं. तसंही लायब्ररीतील बरीचशी जनता डोकावून पाहत होती...

यापेक्षा चांगली संधी नाही,  मी म्हंटलं...

महाराजांनी त्यांच्या 50 वर्षाच्या कारकिर्दीत जेवढे सेनानी पराभूत केले त्यातले फक्त दोघेच भारतीय होते.
बाकी सगळे परकीय होते. त्यांच्या त्यांच्या देशाचे मानांकित सेनानी होते.....

शिवरायांनी पराभूत केलेले सेनानी पाहु - ज्याची लाल महालात बोटं छाटली
तो शाहिस्तेखान तो अबु-तालिबानचा नबाब,
तुर्कस्तानचा नबाब आहे.
तो प्रतिऔरंगजेब या नावाने ओळखला जायचा, औरंगजेबाचा सक्खा मामा आहे तो.
बंगाल प्रांत जिंकुन दिलाय त्याने.. असा बलाढ्य सेनानी महाराजांनी एका रात्रीत तीन बोट छाटली.... पहाट व्हायच्या आत गायब झाला तॊ पुन्हा नाही आला...
तो बहलोलखान पठाण सिकंदर चिडरखान पठाण हे सगळे पठाण अफगाणी आहेत. अफगाणीस्तानचे आहेत हे..

तो दिलेरखान.. मंगोलियन आहे तो, बाबा... मंगोलिया देशाचा सर्वोत्तम योद्धा... महराजांनी त्याचा पराभव केला.
सिद्धि जौहर, सिद्धी सलाबत खान हे सगळे इराणी आहेत. इराण चे आहेत सर्वोत्तम योद्धे आहेत महाराजांनी त्यांचा पराभव केला.

आणि इथं लोणावळ्याच्या उंबरखिंडीत ज्याचा कोंडून पराभव केला...असा की गिनिज बुकला सुद्धा त्याची नोंद घ्यावी लागली की जगातल्या सगळ्यात कमी सैन्याने जास्तित जास्त सैन्याचा पराभव केला
( एक हजार विरुद्ध 30 हजार आणि 30 हजारंचा संपूर्ण पराभव 1000 मधला एकही मावळा न गमावता )

तो कहार्तलब खान तो उझबेकिस्तान म्हणजे आताच्या ताश्कंद रशियाचा आहे त्याचा पराभव केला.

इंग्रज-गवर्नर लिहितो की शिवाजी महाराज जर अजून 10 वर्षे जगले असते तर इंग्रजांना पूर्ण हिंदुस्तानचा नीट चेहरा पाहता सुध्दा आला नसता...

सतराव्या शतकात लंडन मध्ये 3 वृत्तपत्रे प्रकाशीत होत होती. त्यामध्ये लंडन गॅझेट नावाचं वृत्तपत्र होत . शिवाजी महाराज ज्यावेळी आग्र्याहून निसटले त्यावेळी या लंडन गॅझेट मध्ये पहिल्या पानावर ती बातमी छापून आलेली. त्यात शिवाजी महाराजांचा उल्लेख किंग ऑफ स्वराज्या असा नव्हता, किंग ऑफ मराठा असाही नव्हता.... तर त्यात माझ्या राजांचा उल्लेख
Shivaaji the king of India असा होता...

व्हियेतनाम नावाचे छोटसं राष्ट्र आहे हो राष्ट्रचं, आपल्या पुणे जिल्ह्याएवढेपण नसेल. व्हिएतनामचं आत्ताची महासत्ता अमेरिकेसोबत गेली 35 वर्षे युद्ध सुरू होते. पण या युध्दात अमेरिकेला विजय मिळाला नाही. का माहितीये कारण--

त्या व्हिएतनामच्या चौकात शिवाजी महाराजांचा पुतळा आहे.... त्या व्हिएतनामचा स्वातंत्र्यसेनानी "हू जी मीन" नांव त्याचे. त्याच्या समाधीवर लिहून ठेवलंय शिवाजी महाराजांचा एक मावळा येथे चीरविश्रांती घेतोय....

अमेरिकेच्या बोस्टन विद्यापीठात"शिवाजी द मॅनेजमेंट गुरू" या विषयावर 100 मार्काँचा पेपर घेतला जातो.

जगातली 112 राष्ट्र शिवरायांच्या गोरील्ला warfair (युधतंत्र) चा वापर आपल्या अभ्यासक्रमात करतात.

पाकिस्तानच्या पाठ्यपुस्तकात शिवरायांचा अभ्यासक्रम शिकवला जातो.

मी म्हणालो आता तूच सांग सगळं जग शिवरायांचा अभ्यास करतंय तिथं माझ्या देशातल्या अभ्यासक्रमात किती वेळा शिवरायांचा उल्लेख आहे ?

तुम्ही इतिहास शिकलात त्या CBSC मध्ये 1700 पानांचे पुस्तक काढलंय.  त्यात फक्त 4 ओळी आहेत शिवाजी महाराजां बद्दल म्हणून तुला ही माहिती नव्हती... म्हणुन तुम्ही असं म्हणालात...

औरंगजेबाने आयुष्यातीलं ऐन उमेदीची २७ वर्ष तब्बल.... हो  २७ वर्ष या महाराष्ट्रात मराठ्यांशी निकाराची झुंज देण्यात वाया घालवली.

त्याने हिच २७ वर्ष इतर कुठल्याही ठिकाणी घालवली असती तर कदाचीत ही अर्धी पृथ्वी त्याच्या अधिपत्याखाली आली असती... इतक्या प्रचंड शक्तीशाली फौजेचा तो बादशाह होता पण मराठ्यांनी त्याला दिल्लीचे तख्त पुन्हा पाहु दिले नाही...

कारण अख्ख्या जगाला माहिती आहे..की छत्रपती शिवाजी महाराज काय होते. पण भारतातील लोकांनाच माहित नाही.....
                          *जय शिवराय*

Tuesday, 27 March 2018

मानवता

*।। मानवता ।।* 

तु दानवता अंगीकारुनी
देह अलंकारापरी सजवीला ।।
*मानवता* हा दागीना
बाराच्या भावात विकला ।।धृ।।

उलटून बोलतो आईस ।
मारावया धावतो बापास ।।
शत्रु समजुन भावास,
भुमिका दानवाची साकारला ।।१।।

ख-याचे खोटे करतो ।
सत्य शिक्षेला पाठवतो ।।
करुनी *शकुनीचा* कावा,
पांडवा वनवासी धाडीला ।।२।।

आज क्षणाक्षणाला इथे ।
धर्म-अधर्माचे युद्ध चालते।।
युद्धाच्या गर्दीत एखाद्यानेच,
नितीचा झेंडा रोवीला ।।३।।

संतांचे वचन न मानतो ।
मान मर्यादा न पाळतो ।।
करुनी *पाश्चातीचे* सोंग,
विकृत नाचुनी गाजला ।।४।।

विज्ञानवादी बनला मानव ।
पण स्वार्थापाई झाला दानव ।।
क्षणिक सुखाच्या मागे धावून,
स्वत:मात्र *रोबोट* बनला ।।५।।

पाचवर्षाची चिमुकली कळी।
पडली वासनेच्या बळी ।।
मानवतेची *लक्ष्मणरेषा*,
केव्हाच घातली पाताळा ।।६।।
*मानवता* हा दागीना,
बाराच्या भावात विकला ।।धृ।।

Monday, 26 March 2018

खरा तो एकची धर्म

खरा तो एकची धर्म - साने गुरुजी

खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे 

जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलित 
तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे

जयांना ना कोणी जगती सदा ते अंतरी रडती
तया जाऊन सुखवावे, जगाला प्रेम अर्पावे

समस्तां धीर तो द्यावा, सुखाचा शब्द बोलावा
अनाथा साह्य ते द्यावे, जगाला प्रेम अर्पावे

सदा जे आर्त अतिविकल, जयांना गांजती सकल
तया जाऊन हसवावे, जगाला प्रेम अर्पावे

कुणा ना व्यर्थ शिणवावे, कुणा ना व्यर्थ हिणवावे 
समस्तां बंधु मानावे, जगाला प्रेम अर्पावे 

प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी 
कुणा ना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे 

असे जे आपणापाशी असे, जे वित्त वा विद्या
सदा ते देतची जावे, जगाला प्रेम अर्पावे 

भरावा मोद विश्वात असावे सौख्य जगतात
सदा हे ध्येय पूजावे, जगाला प्रेम अर्पावे 

असे हे सार धर्माचे असे हे सार सत्याचे 
परार्थी प्राणही द्यावे, जगाला प्रेम अर्पावे 

जयाला धर्म तो प्यारा, जयाला देव तो प्यारा
त्याने प्रेममय व्हावे, जगाला प्रेम अर्पावे

Wednesday, 14 March 2018

खरा आनंद

१०० लोकांचा एक समूह आयुष्यावर वक्तव्य करणाऱ्या एका प्रख्यात वक्त्याचा सेमिनार अटेन्ड करीत होते...
त्या वक्त्याने प्रत्येकाकडे एकेक फुगा (balloon) दिला . प्रत्येकाने फुगा फुगवायचा आणि त्यावर आपले नाव टाकून हॉल मध्ये सोडायचा होता. सर्व लोक कामाला लागले. प्रत्येक जण आपण फुगवलेल्या फुग्यावर स्वतः चे नाव टाकीत होता. बघता बघता हॉल १०० फुग्यांनी भरून गेला...
नंतर त्या वक्त्याने सर्वांना ५ मिनिटांचा अवधी दिला आणि इतक्या साऱ्या फुग्यांतून स्वतः चे नाव असलेला फुगा शोधायला लावला.!! इतक्या भरगच्च फुग्यांतून स्वतः फुगवलेला फुगा शोधताना सर्वांची तारांबळ उडाली. ५ मिनिटे संपली तरीही कुणीही स्वतः च्या नावाचा फुगा शोधू शकला नाही!!
... नंतर त्या वक्त्याने प्रत्येकाला कुणाचेही नाव असलेला एक फुगा उचलायला सांगितले. प्रत्येकाने एकेक फुगा उचलला. वक्त्याने प्रत्येकाला सांगितले की आपल्याकडे ज्याच्या नावाचा फुगा आहे त्या माणसाला तो फुगा देऊन टाका.
अश्या प्रकारे प्रत्येकजण आपल्या हातातील फुग्यावर ज्याचे नाव आहे त्याला तो देऊ लागला आणि २ मिनिटांत प्रत्येकाकडे स्वतःच्या नावाचा फुगा आला.!!
यावर तो वक्ता बोलू लागला…
"आपल्या आयुष्याचेही असेच झाले आहे.! प्रत्येक जण आनंद, सुख, समाधान या गोष्टी शोधण्यासाठी जंग जंग पछाडतो आहे... परंतु खरा आनंद, खरे सुख कशात आहे याची कुणालाही कल्पना नाही...
स्वतः चा खरा आनंद आणि खरे समाधान इतरांच्या आनंदात दडलेला असतात. इतरांना त्यांचा आनंद द्या आणि त्याबदल्यात तुम्हालाही नक्कीच आनंद आणि समाधान मिळेल. मानवी आयुष्याच्या यशाचे खरे गमक यातच आहे...." हे ऐकून संपूर्ण हॉल नि:शब्द झाला....

Tuesday, 6 March 2018

पिढीतील अंतर

पिढीतील अंतर

Updated Apr 23, 2010, 12.00AM IST

- गंगाधर पानतावणे

पिढी हा केवढा सन्मानाचा शब्द! आमची पिढी अमूक, आमची पिढी तमूक असे गौरवाचे उद्गार व्यक्त होतात. या निमित्ताने पूर्वजांचं स्मरण होतं. क्वचित कधी आपल्या अस्तित्वाचं नातंही पूर्वपिढ्यांशी जोडलं जातं. पिढी म्हटलं की, विशिष्ट वर्षांची गणना. साधारणत: तीसएक वर्षांची एक पिढी आणि त्यानंतर दुसरी पिढी. हे वयच असं प्रौढतेचं. पिढ्यापिढ्यातील अंतर वेगळाल्या कारणांनी मापलं जातं. विचारसरणी, दृष्टिकोण, जगण्याची शैली, मूल्यात्मकता या बाबी वेगळाल्या पिढ्यांमध्ये वेगळाल्या असतात. त्यात समानता असतेच असं नाही. किंबहुना भिन्नताच अधिक. वृद्ध-वयस्कांची जीवनधारणा तरुणांच्यासारखी नसतेच मुळी. वयातील अंतराचाही हा परिणाम असावा. अंतरामुळे कुटुंबात अपसमज आणि मतभिन्नता संभवते.

वयस्कांची जगण्याची रीतच निराळी. त्यांचे परंपरेशी आंतरिक नाते असते. म्हणून तरुणांच्या जगण्याशी त्यांची नाळ जुळत नाही. प्रत्येकाच्या आशाआकांक्षाही वेगळ्या. वयस्कांचे पूर्वानुभव आणि नव्या पिढीचे अनुभव यात कमालीचे अंतर असते. 'आम्ही चार पावसाळे अधिक पाहिले' ही उक्ती तरुणाईचा तेजोभंग करण्यासाठी नसते, तर तो खडतर जीवनानुभव असतो, पण अनेक तरुणांना ती आत्मप्रौढी वाटते आणि वयस्क माणसं आम्हाला नाउमेद करतात; आमच्या मुक्ततेला बांध घालतात अशी त्यांची धारणा होते.

हे खरं आहे की, अनेक वृद्ध-वयस्कांना आधुनिकतेत रमता येत नाही. त्यांना आपल्या भूतकाळाचे पुन: पुन्हा स्मरण होते. आपला भूतकाळच त्यांना आदर्श वाटतो. आधुनिकतेचा-नवतेचा स्वीकार करायला त्यांची मानसिकता अनुज्ञा देत नाही आणि मग तरुणांच्या आधुनिकतेला ते प्रतिसाद देत नाहीत. उलट मनात एक अढी निर्माण होते. नव्या पिढीने आपल्या पूर्वजांच्या प्रथा आणि परंपरा ठोकरून देता कामा नयेत. त्यांच्याशी समायोजन करावे, अशी त्यांची अपेक्षा असते. परंतु पिढीच्या अंतरामुळे त्यांना जाणीवच नसते की, पुष्कळ परंपरा आणि प्रथा निरुपदवी असतात. हानिकारक नसतात. पण उपयुक्त मात्र असतात. हे जसे तरुण पिढीच्या संदर्भात म्हणता येईल, तसेच वयस्क पिढीच्याही संदर्भात म्हणता येईल की, त्यांच्या हे लक्षातच नसते की, आपण तारुण्यात असताना आपल्या पूर्वपिढीने अशाच अपेक्षा बाळगल्या होत्या. असा संघर्ष कुटुंबातसुद्धा उद्भवतो. पण वयस्क-वृद्धांची विचारसरणी विध्वंसक असते असे म्हणता येईल का? त्यांच्या अपेक्षा स्फोटक असतात असेही नाही म्हणता येत! पण काळ - आणि काळाचे अंतर हेच त्याचे उत्तर आहे. प्रत्येक पिढी आपली अस्तित्वधारणा जपत असते. मूल्यस्वीकाराची समस्या पिढीतील अंतर कमी करू शकते असे म्हणता येईलच. मात्र मूल्यांची लादणूक अविचार आणि अंधश्ाद्धेला रुजवित राहतात, हे नाही विसरता येत!

कुटुंबातील कर्मठ पालक आणि नव्याचे स्वागत करणारे यातील सामंजस्य आणि संवाद कसा निर्माण होणार? मतांचे आग्रह संघर्षाचं पोषण करतात. म्हणून वृद्ध-वयस्कांनीच नव्या पिढीच्या मानसिकतेला टोकाचे शस्त्र न परजताही सौहार्द निर्माण करता येईल. सुसंवाद आणि सामंजस्य पिढीतील अंतर कमी करू शकतात. जीवनाच्या सर्व क्षेत्रांत हीच मूल्ये उपयुक्त ठरू शकतील. वयस्कांना नव्या पिढीतील तरुणांना समजून घेण्यासाठी क्षमता संपादन केली पाहिजे आणि तरुणांनी आपण कायम तरुण राहणार नाही याचे भान ठेवले पाहिजे. 'कृतांत कटकामल ध्वजा जरा दिसो लागली', ही मोरोपंतांची उक्ती लक्षात ठेवायलाच हवी.

पिढीतील अंतर म्हणजे एक नाट्यच; ज्याला सलग नि सरळसोट कथानक नाही. उलट गुंतागुंतच अधिक. पाश्चिमात्य देशात अलीकडे मान्यच केले जात आहे की, सामाजिक संवादाच्या अभावामुळे पिढीतील अंतर वाढत चालले आहे. परिणामस्वरूप वृद्ध-वयस्क, नव्या पिढीतील तरुणांना ओझे वाटत आहेत. एवढेच नाही तर परस्पर नातेसंबंध आणि अनुबंध नष्ट होऊ लागले आहेत. भविष्य चिंताक्रांत करणारे असले तरी जुनी पिढी आणि नवी पिढी, यातील अंतर धुके विरून जावे त्याप्रमाणे मिटून जाऊ शकेल. फक्त अवैरत्व, सामंजस्य आणि अतूट स्नेहभाव निष्कलंक राहायला हवा. बुद्ध म्हणाले होते-

न हि वेरेन वेरानि समन्तीध कुदाचनं

अवेरेन च सम्मन्ति... वैराने वैर कधीच शमत नाही. मैत्री स्नेहभाव यामुळेच वैराचे शमन होते.
......

गंगाधर पानतावणे हे 'अस्मितादर्श'चे प्रमुख संपादक, मराठीचे नामवंत प्राध्यापक, ज्येष्ठ विचारवंत आणि दलित साहित्याचे चिंतनशील अभ्यासक आहेत.